कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. या कुडाळच्या संस्थेची स्थापना दि. १० फेब्रुवारी १९६२ रोजी कुडाळ येथे एका भाड्याच्या लहान जागेत मा. कै. चिटोजीराव अर्जुन सावंत व त्यांचे सहकारी मित्रमंडळ यांनी केली. सुरुवातीस शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या शेती साहित्य, खते यांचे गावोगावी वितरण करण्यास सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळामध्ये संघाची उलाढाल कमी झाल्याने संघास तोटा सहन करावा लागला व शासनाने संघ थकीत झाल्यामुळे संघावर मान. कै. शिवराम भाऊ जाधवसाहेब यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. या काळापासूनच संघाच्या भरभराटीस सुरुवात झाली.

मा. कै. जाधवसाहेब यांनी तन, मन, धन अर्पण करून या संघास उर्जितावस्था आणण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन, सातत्याने प्रयत्न करून संघ भरभराटीस आणला. मध्यंतरीच्या काळामध्ये संघ वेलणकर बिल्डिंगमध्ये स्थलांतरित होऊन त्या ठिकाणी संघाने खत व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढविला. तालुका साखर एजन्सी शासनामार्फत मिळवली. तसेच एच. पी. सी. कंपनीची गॅस एजन्सी, कापड दुकान, भांडी दुकान, जीवनावश्यक माल विक्री केंद्र अशा प्रकारचे अनेक व्यवसाय सुरु केले. त्यातूनच संघाची भरभराट झाली. त्यानंतर संघाचे लोकनियुक्त संचालक मंडळ निवडून आले व या संचालकांच्या कारकिर्दीपासून संघाची उत्तरोत्तर भरभराट होऊ लागली.

त्यानंतर संघाने कुडाळ कॉलेज समोर श्री. राम श्रीधर प्रभू यांनी अल्प दराने आपली जमीन जाधवसाहेबांच्या प्रयत्नामुळे विक्रीस दिली. आणि या जागेवर संघाने गोडावून स्कीम खाली एक इमारत उभी केली. व या इमारतीत आपले कार्यालय सन १९९६ मध्ये स्थलांतरित केले. त्यानंतर जाधव साहेबांच्या प्रयत्नातून संघाने साधना बझार सुरु करण्यासाठी नवीन इमारत बांधकाम केले. त्याला तालुक्यातील व अन्य ठिकाणच्या जनतेने चांगला उस्फुर्त प्रतिसाद दिला व या उपक्रमामुळे संघाच्या भरभराटीस मदत झाली. तसेच या गॅस एजन्सीद्वारे सुरुवातीच्या काळापासूनच संघाने चांगली कामगिरी करून या एजन्सीच्या मिळणाऱ्या लाभामुळे संघाची आर्थिक स्थिती मजबूत होण्याच्या कामी फार मोठे सहकार्य लाभले.

आज या एजन्सीद्वारे घरगुती गॅस वितरण संख्या १८००० वर पोहोचलेली आहे. आज संघाचे सर्व उपक्रम फायद्यात सुरु आहेत. ग्राहकांच्या सेवाभावी वृत्तीने ग्राहकांना संचालक मंडळ व कर्मचारी वृंद हे अतिशय तत्परतेने व चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न नेहमीच करतात. आज संघाची आर्थिक स्थिती मजबूत आहे. संघ साधारणपणे १२ कोटींची उलाढाल स्वफंडातून करीत आहे. या संघाची अत्यंत जमेची बाजू म्हणजे हा संघ शासन अगर अन्य कोणत्याही वित्तीय संस्थांचे कोणतेही देणे नाही.

Close Menu