कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचा “सुवर्ण महोत्सव” साजरा करीत असताना संस्था अध्यक्षांचे मनोगत,

मित्र हो, आज आपण कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचा “सुवर्ण महोत्सव” साजरा करीत आहोत. ही एक आनंदाची गोष्ट आहे. कै. चिटोजीराव सावंत व सहकाऱ्यांनी हे रोपटे सॅन १९६२ साली लावले. नंतरच्या काळात या रोपट्याचे संगोपन व संवर्धन करण्याचे काम स्वर्गीय सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांनी केले. हे काम करीत असताना जाधव साहेब हे सहकारातील “साहेब” या पदाला कधी पोहचले हे सिंधुदुर्ग वासियांना कळलेच नाही. याचे कारण जाधव साहेबांची समर्पित पणे काम करण्याची पद्धत, निस्वार्थी वृत्ती, त्याग, सचोटी, प्रामाणिकपणा व सर्वांबद्दल आदराची भावना या त्यांच्या वृत्तीमुळे माणसे त्यांच्याकडे आपोआप ओढली जात. या पद्धतीने मी सुद्धा सुमारे तीस वर्षांपूर्वी त्यांच्याकडे ओढला गेलो व त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली या संघाच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सुमारे १० वर्षे सांभाळत आहे. या जिल्ह्यात स्वर्गीय जाधव साहेबांनी समर्थ कार्यकर्ते घडविले. त्यामुळे आज जरी साहेब आमच्यात नसले तरी त्यांची सहकारी चळवळ त्यांचे कार्यकर्ते वृद्धिंगत करतील यात तीळमात्र संशय नाही.

आमच्या संघाच्या भरभराटीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये महत्वाचे संचालक मंडळ. साहेबांनी संचालक मंडळामध्ये राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून सर्व समावेशक संचालक मंडळ निवडण्यास प्राधान्य दिले व ते आज तागायत चालू आहे. त्यामुळे संचालक मंडळाचे सर्व निर्णय एकमताने घेतले जातात. व त्या निर्णयांची अंमलबजावणी करणारा कर्मचारी वृंद हा कर्मचारी नसून तो जणू काही संघाचा कणाच आहे. आमचा कर्मचारी वृंद हा तन, मन, धनाने संघाची सेवा करीत आहे. कोणताही कर्मचारी घड्याळी तासांचा विचारच करीत नाही. आपल्या हातातील किंवा आपल्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे पार पाडीत आहे. त्याच बरोबर आमच्या संघाबद्दल प्रेम असणारा ग्राहक वर्ग. या सर्वांमुळे आज संघ भरभराटीस येण्यास मदत झालेली आहे. संघ आज स्वतःच्या मालकीच्या इमारतीमध्ये आपले व्यवसाय चालवित आहे. व तसेच कोणत्याही वित्तीय संस्थेच्या सहाय्याशिवाय स्वनिधीतून आपल्या व्यवसायाची उलाढाल करीत आहे. हे आज मी अभिमानाने कथन करीत आहे.

Close Menu