सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा इतिहास लिहावयाचा ठरविल्यास, शिवराम भाऊ जाधव यांचा उल्लेख या जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे "भिष्मपितामह" असाच करावा लागेल. या जिल्ह्यातील सहकार वाढीसाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अनन्य साधारण असे योगदान दिले त्या यादीत "शिवराम भाऊ जाधव", हे नाव सर्वात अग्रस्थानी असेल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सहकार वाढीसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. जीवघेणी मेहनत केली. शहरीभागापासून ते डोंगरदऱ्या गिरिकंदरापर्यंत, असेल तर वाहन नाहीतर पायी प्रवास केला. त्यांनी एखाद्या झपाटलेल्या वैदयात्रिकाप्रमाणे सहकार क्षेत्राला झोकून देऊन अपार, अफाट कष्ट सहकारासाठी उपसले. गरिबातील गरीब सामान्य माणूस यांचा त्यांनी कनवाळूपणे विचार केला. व त्यांच्या उन्नतीसाठी पोटतिडकीने अपार मेहनत घेतली. आलेल्या आपत्ती विपत्तीवर, अत्यंत प्रतीकूल अशा परिस्थितीवर अत्यंत परिश्रमपूर्वक मात करणे व निर्धारपूर्वक आपले काम करीत राहणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ठ होते.

सरकार महर्षी कै. शिवराम भाऊ जाधव यांचे मडगाव (गोवा) येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. कै. शिवराम भाऊ जाधव यांचा जन्म १ जून १९३६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हरकूळ बु. या गावी झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले आणि माध्यमिक शिक्षण मुंबईच्या परेल येथील आर. एम. हायस्कूलमध्ये झाले होते. आर. एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक तत्कालिन समाजवादी नेते, मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आचार्य मो. वा. दोंदे होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे शिवरामभाऊंच्या विचारांवर समाजवादी विचारांचा प्रभावही पडला होता. पण शिवराम भाऊ जाधव समाजवादी पक्षात कधी सक्रिय झाले नाहीत. आचार्य विनोबा भावे यांनी त्याकाळी भूदान यात्रा सुरु केली होती. शिवराम भाऊ जाधव भूदान यात्रेकडे आकर्षिले गेले आणि त्या यात्रेत सहभागी झाले. शिवरामभाऊ जाधव यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा शुभारंभ भूदान यात्रेने सुरु झाला होता. या यात्रेमध्ये आचार्य विनोबा भावे ज्या गावांना भेटी देत त्या गावांना शिवराम भाऊ आणि त्यांचे सहकारी आदल्या दिवशी भेट देऊन विनोबाजींच्या भूदान यात्रेची पूर्वतयारी करत असत.

भूदान यात्रेनंतर शिवराम भाऊ जाधव यांनी तत्कालिन रत्नागिरी जिल्हा हे आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. राजकारणापेक्षा सहकार आणि शेती या क्षेत्राची त्यांनी निवड केली. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आकारी पड जमीनीतील शेतकऱ्यांना संघटित करून त्या जमिनी कसणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभे केले. माणगाव खोरे हे भाताचे कोठार म्हणून रत्नागिरी जिल्ह्यांत प्रसिद्ध होते. परंतु हिवतापाच्या आणि इंफुएन्जोच्या साथीमुळे या भागातील शेतकरी शेती सोडून निघून गेले होते. त्यामुळे या खोऱ्यातील सुपीक जमिनी दीर्घ काळ ओस पडल्या होत्या. कालांतराने शासकीय प्रयत्नांनी माणगाव खोऱ्यातील हिवतापाचा बिमोड झाल्यावर या जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी एक साली कराराने शेतकऱ्यांना कसवटीसाठी देण्यात आल्या होत्या. एक साली कराराने दीर्घकाळ कसणाऱ्या या जमिनी त्यांच्या नावे कराव्यात ,यासाठी हे आंदोलन उभारले गेले. शिवरामभाऊ जाधव, विजय नारकर ,कै. मधु तिरोडकर ,कै. मुकुंदराव गाड आणि सर्वोदयी कार्यकर्त्यांनी या कार्यात पुढाकार घेतला होता. आकारी पड जमिनी कसवटदारांच्या नावे कराव्यात या मागणीसाठी त्यावेळी माणगाव खोऱ्यातील आकारी पड जमिनीतील शेतकऱ्यांच्या सावंतवाडीच्या प्रांत कचेरीवर या मंडळींनी काढलेला अभूतपूर्व आणि अविस्मरणीय मोर्चा सिंधुदुर्गवासियांच्या दीर्घकाळ लक्षात राहिला. कालांतराने राजकीय पक्षांनी या मागणीलाही पाठिंबा दिला. शासनाने या मागणीचा विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने या जमिनी कसवटदार संबंधित शेतकऱ्यांचा देण्याची शिफारस केली होती. शासनाने ही शिफारस स्वीकारून या जमिनी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेऊन जमीन वाटपाची कार्यवाही सुरु झाली आहे. परंतु ही कार्यवाही अर्धवट राहिली असल्याने उर्वरित जमीन उर्वरित शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. अशा प्रकारे आकारीपड जमिनीच्या वाटपासाठी शिवराम भाऊ जाधव यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचे उद्दिष्ट बऱ्याचअंशी सफल झाले आहे.

आचार्य विनोबा भावे यांनी भूदान आंदोलन सुरु केल्यावर ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी भूदान चळवळीला आपले जीवन वाहून घेतले होते. जयप्रकाशजींचा आदर्श नजरेसमोर ठेवून शिवराम भाऊ जाधव यांनी आपले उर्वरित आयुष्य सहकाराला अक्षरशः वाहून घेतले होते. डबघाईला आलेल्या कुडाळ तालुका खरेदी विक्री संघावर प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यावर अपार कष्ट आणि कल्पकतेने हा संघ उर्जितावस्थेला आणला. कणकवली तालुका खरेदी विक्री संघ लिक्विडेशन मध्ये निघाल्यावर तेच कार्य करणाऱ्या तालुका शेतकरी संघाची उभारणी करून तो संघ उर्जितावस्थेला आणला आहे. १९७४ साली कुडाळ तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदार संघातून त्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रथमच लढवली होती. अशा प्रकारे शिवराम भाऊ जाधव यांची सहकारी क्षेत्रात काँग्रेस पक्षाशी जवळीक साधली गेली होती. नंतरच्या काळात काँग्रेस पक्षात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, भारताचे शेतीमंत्री नामदार शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन शिवराम भाऊ जाधव, शरद पवार यांचे विश्वासू सहकारी झाले.

१९७७ ते १९८३ सहा वर्ष शिवराम भाऊ जाधव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. १९८० साली बॅ. ए. आर. अंतुले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केली. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनानंतर १९८३ साली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभक्तीकरण करून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निर्मिती करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पहिले संचालक मंडळ शासनाने नियुक्त केले होते. एकत्रित रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री. शिवराम भाऊ जाधव होते. ही वस्तुस्थिती विचारात घेता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या शासन नियुक्त संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांच्या ऐवजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. केशवराव राणे यांची नियुक्ती केली गेली होती. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात कै. शिवराम भाऊ जाधव यांचा सर्व तालुक्यातून कार्यकर्त्यांशी सततचा व जवळचा संबंध असल्याने त्यानंतर झालेल्या निवडणूकीत शिवराम भाऊ जाधव यांचे संचालक मंडळावर मागील पर्वाचा अपवाद वगळता सतत वर्चस्व राहिले होते व सलग दहा वर्षे त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते. शिवराम भाऊ जाधव यांनी जिल्हा सहकारी बोर्डापासून, महामँगो, वृक्षशेती, मजूर दूध यासारख्या अनेक प्रकारच्या सहकारी संस्था, सिधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन केल्या आणि उभ्याही केल्या. तसेच जिल्ह्यातील डबघाईला आलेल्या संस्थाही त्यांनी उर्जितावस्थेत आणल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील पहिली सहकारी कौल उत्पादक संस्था तसेच जिल्हास्तरीय सहकारी वृक्षशेती संस्था ही त्याची चालती-बोलती उदाहरणे आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना बाहेरच्या जिल्ह्यातील अनेक सहकारी कारखान्यांना अर्थपुरवठा करून त्यांनी सहकारी कारखान्यांच्या उभारणीस अगर स्थैर्यास हातभार लावला. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा सारख्या दुर्गम आणि मागासलेल्या भागात डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या आर्थिक साहाय्यावरच उभा राहिला आहे. याचे श्रेय कै. शिवराम भाऊ जाधव यांनाच आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे त्यांनी प्रतिनिधीत्व केले होते. सहकारी क्षेत्रात नामदार शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून वावरले. नामदार शरद पवार यांच्या आर्शीवादाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कै. शिवराम भाऊ जाधव यांचे सहकार क्षेत्रातील कार्य अतुलनीय होते. त्यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकारी चळवळीची वाढ संख्यात्मक झाली नसली तरीही गुणात्मक झाली होती, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत सलग तीन वेळा उत्कृष्ट प्रशासनाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल एका वाक्यात सांगायचे झाल्यास 'झाले बहू, आहेतही बहू, होतीलही बहू, परंतु या सम हा' ! असे सांगता येईल. सहकार क्षेत्राप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रातील शिवराम भाऊ जाधव यांचे कार्य उल्लेखनीय आहे. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण, सर्वोदयी नेते आचार्य विनोबा भावे, गांधीवादी कोकणचे गोणी कै. अप्पासाहेब पटवर्धन आणि साने गुरुजी हे शिवराम भाऊंचे आदर्श होते. कोकणचे गोणी कै. अप्पासाहेब पटवर्धन यांच्यासमवेत गोपुरीत राहून अप्पासाहेबांच्या भंगी मुक्ती मोहिमेतही ते सहभागी झाले होते. आपल्या जीवनातील हा आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने कै. शिवराम भाऊ जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागातील शैक्षणिक गरज विचारात घेऊन त्यांच्या स्मृत्यर्थ माध्यमिक शाळा सुरु केल्या आहेत. कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे जयप्रकाश नारायण यांच्या नावाने पहिली माध्यमिक शाळा सुरु केली असून सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे या गावी कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या स्मृत्यर्थ माध्यमिक शाळा सुरु केली आहे. तर वाडोस येथे ग्रंथालयाच्या रूपाने प. पू. साने गुरुजींच्या स्मृत्यर्थ वाचनमंदिर उभारण्यास प्रोत्साहन दिले आहे. पहिली काही वर्षे या शाळा त्यांनी विनाअनुदान तत्वावर चालविल्या आहेत. प्रतिवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या सार्वजनिक कार्यास हातभार लावण्यासाठी त्यांच्या मित्रपरिवाराकडून त्यांना दिल्या जाणाऱ्या थैलीची रक्कम आजवर त्यांनी या शाळांच्या उभारणीस दिली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे हे कार्य बहुमोल असेच आहे.

शिवराम भाऊंच्या यशस्वी जीवनात सौ. प्रमिला वहिनींचा सहभाग सर्वाधिक होता. दोघे पती पत्नी गणपतीचे निस्सिम भक्त. त्यामुळे संकष्टीचे व्रत त्यांच्या घरात कटाक्षाने पाळले जाई. संकष्टीच्या दिवशी शिवराम भाऊ जाधव न चुकता घरी असत. सौभाग्याचे कुंकू कपाळी असताना मृत्यू यावा अशी प्रत्येक हिंदू पतिव्रतेची प्रामाणिक इच्छा असते. तसेच इच्छामरण सौ. प्रमिला वहिनींना लाभले. पण वहिनींच्या निर्वाणाने शिवराम भाऊ एकाकी पडले. शिवराम भाऊ जाधव यांचा मित्र परिवार फार मोठा होता. पण खरे प्रामाणिक मित्र कोण आणि आपमतलबीपणाने गोळा झालेले कोण हे ओळखण्यात काहीवेळा त्यांचे अनुमान चुकले. त्यामुळे आपमतलबासाठी जवळ आलेली काही मंडळी त्यांच्यापासून दूर जाताच त्यांची विरोधक झाली. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात 'डायबेटीस' सारख्या दुर्धर विकाराने त्यांना ग्रासले होते. सारखी फिरती, दुसऱ्याला त्रास न देण्याची वृत्ती आणि दुराग्रही (हट्टी) स्वभाव त्यामुळे पथ्यपाणी त्यांच्याकडून पाळले गेले नाही. परिणामी आयुष्याच्या अखेरच्या पर्वात दोन्ही पाय त्यांना गमवावे लागले. त्यादरम्यान हृदयविकारानेही त्यांना ग्रासले होते. त्यामुळे 'बायपास सर्जरी' ही करावी लागली होती. दोन्ही पाय गेले असतानाही फिरत्या खुर्चीने ते सर्वत्र फिरत असत आणि आयुष्याच्या अंतापर्यंत जीवनात ते सक्रीय होते. सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अतुलनीय होते. त्यांच्या मृत्यूने सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रांची अपरिमित हानी झाली आहे.

Close Menu