कोकण हा महाराष्ट्र राज्याचा ७२० कि. मी. लांबीची किनारपट्टी लाभलेला विभाग आहे. हा विभाग उत्तरेकडून दक्षिण दिशेला चिंचोळा होत जाणारा भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे. जगाच्या नकाशात कोकण प्रदेश हा १५ ३७ ते २० २० उत्तर अक्षांश आणि ७०७ ते ७४ १३ पूर्व रेखांशात दर्शविलेला आहे. कोकण विभागाने २९.३७ लाख हेक्टर जमीन व्यापलेली असून ती पर्वत उतारांनी बनलेली आहे. भात खाचराच्या जमिनी,नद्या आणि समुद्रालगतच्या जमिनी सपाट आढळतात.कोंकण विभागात बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांच्या समावेश होतो. ह्या विभागात २५०० ते ४००० मि.मी. भरवश्याचा आणि वर्षातून भरपूर मान्सून मोसमी पाऊस पडतो. या विभागातून संपूर्ण वर्षभर समशीतोष्ण व दमट हवामान असते. अशा ह्या चिंचोळ्या ७२० कि.मी. कोंकण किनारपट्टीत मृदा आणि जमिनीची उपयोगिता याबाबत अधिक विविधता आढळते.

दक्षिण कोंकण किनारपट्टी विभागात फलोद्यान पीक पद्धती आणि उत्तर कोंकण किनारपट्टी विभागात भात पीक पद्धतीचा अवलंब केला जातो.खोलगट जमिनीत भात-भाजीपाला, भात , तेलबिया ही पीक पद्धती अवलंबली आहे. शेतकरी प्रामुख्याने पावसावर अवलंबून असलेले भात पीक घेतात. तसेच या जमिनीत भात, डाळ वर्गीय पिके, कोंकण विभागातील जमिन ही फळपिकांची ओळखली जाते. फळांचा राजा हापूस तसेच डॉलर कमविणारा काजू आणि अरबस्तानात जाणारी सुपारी याच जमिनीत उत्पादित होते. काळीमिरी,लवंग,जायफळ आणि दालचिनी यासारखी मसाल्याची पिके उत्पादित होतात. तसेच चिकू,अननस,कोकम,फणस,जांभूळ आणि करवंदे इत्यादी फळ पिके चांगल्या प्रकारे उत्पादित होतात.

कोंकण भूमीतील मातीत विविधता आढळते, म्हणून शेतकऱ्यांना मृदा विषयक निरनिराळ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते.जमिनीची धूप,जमिनीची खोली कमी असणे,कमी बेस सॅच्युरेशन क्षमता, किनाऱ्यालगतची क्षारता, भरतीच्या वेळी महापूर पाणी वाहून जाणे लोह आणि अल्युमिनियमचे जास्त प्रमाण हे प्रश्न भेडसावणारे आहेत. खाडीलगत किंवा समुद्रालगतच्या जमिनीत पीक संवर्धनाबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. खाडीचे,समुद्राचे पाणी जमिनीवर येणे, पाण्याचा निचरा न होणे,अन्नद्रव्ये पुरविण्याची कमी क्षमता, लोह व अल्युमिनियमची जास्त प्रमाण इत्यादी प्रश्न शेतकरी वर्गास भेडसावतात.

हवामान तज्ज्ञ सांगतात की कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइडमुळे येत्या दोन ते तीन दशकात तापमान वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे बर्फ़ाळ प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे क्षारयुक्त पाणी जमिनीवर येऊन जमिनी क्षारयुक्त आणि बुडिताखालील होतील . कोंकण विभागात जमिन प्रदूषण हा दुसरा ज्वलंत प्रश्न निर्माण होणारा आहे. औद्योगिकीकरण, रासायनिक कारखान्यांचे आगमन, शहरीकरण यामुळे जमिनी प्रदूषित होत आहेत. कारखान्यांनी सोडलेले वायू किंवा सांडपाणी यातील घटक झाडांच्या वाढीस विषबाधा पोहचवू शकतात. त्यामुळे याकडेही कोंकण विभागातून लक्ष पुरविणे गरजेचे आहे. कोंकण विभागाचे कृषी हवामानावर आधारित २ भाग पडतात. उदा. अति पर्जन्यमान आणि जाम्भायुक्त जमिन असलेला दक्षिण कोंकण किनारपट्टी विभाग तसेच अति पर्जन्यमान आणि जाम्भाविरहित जमिन असलेला उत्तर कोंकण विभाग दक्षिण कोकणात जाम्भायुक्त, खारजमीन आणि आम्लयुक्त सल्फेट जमिनी (मोरीक) आढळतात. तसेच उत्तर कोकणात मध्यम काळी, खार जमिन लाल तपकिरी उथळ इत्यादी जमिनी आढळतात.

Close Menu