देशातील वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी भविष्यकाळामध्ये अन्नधान्यांचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. परंतु अलिकडे रासायनिक खतांचा अतिवापर व सेंद्रिय पदार्थांचा कमी पुरवठा यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता घटू लागली आहे. तसेच अलिकडच्या काळात रासायनिक खतांच्या किंमतीही वाढत असल्यामुळे विशेषतः कोरडवाहू विभागात शेती किफायतशीर करणे अवघड होवू लागले आहे. त्यासाठी जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर मर्यादित करून शेणखत, प्रोटोमील खत तसेच हिरवळीच्या खतासारख्या सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविल्यास जमिनीची उत्पादनक्षमता वाढविता येईल.

सेंद्रिय पदार्थाला जमिनीचा प्राण किंवा केंद्रस्थान म्हणतात. काही वर्षापूर्वी अमाप पैसा कमविण्याच्या उद्देशाने काही साखरसम्राटांनी उसाची मळीमिश्रीत माती विकून बळीराजाचा विश्वासघात केला त्यामुळे बळीराजाचा सेंद्रिय खताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. पण सरकारने नविन लागू केलेला एफ. सी. ओ. कायद्याखाली काही ठराविकच खते राहिल्यामुळे उदा. (प्रोटोमिल, हॉर्टिमिल इ.) शेतकऱ्यांची फसवणूक थांबली आहे. सेंद्रिय पदार्थामुळे मातीच्या कणांची रचना दाणेदार बनून स्थिर होण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते, निचरा चांगला होतो. व हवा खेळती राहते. १६ अन्नघटकांचा पुरवठा होतो. पावसाळ्यात होणारी जमिनीची धूपही कमी होते. भारी चिकटमातीच्या जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यास जमिनीचा आकसपणा, चिकटपणा कमी होवून जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे करता येते. रेताड व हलक्या जमिनीत सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची जलधारणक्षमता वाढते आणि नियमाद्वारे वाहून जाणारे पाणी व अन्नद्रव्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पीक उत्पादन वाढीस मदत होते. सेंद्रिय पदार्थांच्या वापरामुळे जमिनीतील उपकारक अशा अँझोटोबॅक्टर आणि रायझोबियमसारख्या हवेतील नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची वाढ होते. त्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जमिन नांगरून त्यात ताग, शेवरी किंवा धैंच्या पेरून एक दिड महिन्यासाठी जमिनीत गाडल्यास उत्तम हिरवळीच खत मिळते. विशेषतः खारवट, चोपण जमिनी सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांचा चांगला उपयोग होतो.

सेंद्रिय खतांचे दोन प्रकार पडतात :

१) भरखते
२) जोरखते

भरखत – शेणखत, कंपोस्ट, लेंडी, सोनखत, हिरवळीचे खत, गांडूळ खत इ.
जोरखत – सर्व प्रकारची पेंडी, मासळी प्रोटोमील खत यांचा समावेश होतो.

भरखतामध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ही खते मोठ्या प्रमाणात द्यावी लागतात. तसेच ही खते पिकांना सावकाशपणे लागू पडतात. जोरखतामध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण भरखतापेक्षा जास्त असते. तसेच तण विरहित असतात. त्यामुळे भरखतापेक्षा कमी प्रमाणात द्यावी लागतात. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती पाहता सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आणि पूरक म्हणून योग्य त्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर कार्यक्षम पद्धतीने करणे आवश्यक आहे.

Close Menu