महाराष्ट्र राज्यात सन १९९०-९१  पासून रोजगार हमी योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानित फळझाड लागवड ही महत्वाकांक्षी योजना सुरु झाल्यापासून फळबाग लागवडीची संकल्पना कोकणातील शेतकऱ्यांच्या मनात खोलवर रुजली आहे. फळबाग लागवड ही कोकणातील पडिक जमिनीला मिळालेले वरदानच आहे. आतापर्यंत कोकणातील पडिक जमिनीपैकी २५ टक्के पेक्षा जास्त लागवडीलायक पडिक जमिन फळबाग लागवडीखाली आलेली आहे. परंतू अद्यापही फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही. ही वस्तूस्थिती आहे. अशा परिस्थितीत फळबाग लागवडीत यशस्वी होण्यासाठी फळबाग लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन या महत्वाच्या बाबी आहेत.

फळबाग लागवडीच्या पूर्वतयारीमध्ये खालील बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे –

१. जमिनीची निवड.
२. हवामानानुसार फळ झाडांची निवड.
३. पाण्याची सोय.
४. कलमे रोपांची उपलब्धता.
५. फळ बागेची आखणी.
६. रोपे लागवडीची योग्य वेळ.
७. कुंपण
८. १०० टक्के अनुदानित योजनेत सहभागी व्हावयाचे असल्यास  कागदपत्राची पूर्तता.

१. जमिनीची निवड :-

कोकणातील जांभ्या दगडापासून तयार झालेली तांबड्या मातीची, मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी जमिन ही फळबाग लागवडीस योग्य आहे. फळबाग वर्षानुवर्षे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषून घेतात म्हणून जमिनीची निवड करताना फळपिकानूरुप जमिनीची खोली, तिची सुपिकता, निचरा होण्याची क्षमता, मातीमध्ये असलेल्या द्राव्य व विद्राव्य क्षारांचे प्रमाण या महत्वपूर्ण बाबींचा विचार झाला पाहिजे. जास्त क्षारयुक्त जमिनीत फळझाड लागवड यशस्वी होत नाही. सर्वसाधारणपणे ५.५ ते ७.५ पर्यंत सामु असलेल्या जमिनीत फळबाग लागवड यशस्वी होतात.

एकदा फळबाग लागवड करण्याचे निश्चित झाले की, प्रथम आपल्या कडील उपलब्ध क्षेत्रामध्ये जमिनीचा उंचसखलपणा, डोंगरउतार, सपाट व जमिनीचा उथळपणा पाहून योग्य पिकाकरिता योग्य जागेची निवड करावी. फळबाग या अती क्षारयुक्त, पाणथळ पाण्याचा योग्यप्रकारे निचरा न होणाऱ्या कठीण सलग काळे दगडाचे कातळ आलेल्या जमिनीत यशस्वी होत नाहीत.

डोंगर उतारावरील समुद्रकिनाऱ्यालगतची, समुद्राकडे (पश्चिमेस) तोंड करून असलेल्या जमिनीत हापूस आंबा लागवड उत्तम व यशस्वी होते. या उलट समुद्र किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी आंबा लागवडीस जमिन अनुकूल नाही अशा ठिकाणी डोंगर उतारावर, सपाट पठार जमिनीत काजू लागवड यशस्वी होऊ शकते. ज्या जमिनी उथळ आहेत त्या ठिकाणी वर्षभर पाण्याची उपलब्धता आहे. अशा जमिनीत कमी खोलवर पसरणाऱ्या नारळ, सुपारी, चिकू या बागायती फळ झाडांची निवड करावी. निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये चर काढणे यासारखी उपाययोजना करून निचऱ्याची व्यवस्था करून बागायती फळझाड लागवड करावी. समुद्र किनाऱ्यापासून दूर असलेल्या परंतू कोरडे हवामान असलेल्या जमिनीतही आंब्याच्या इतर जाती राजा, सिंधु, केशर चांगल्या प्रकारे येतात. उष्ण दमट हवामान असलेल्या सपाट जमिनीत कोकम, फणस, आवळा, जांभूळ यासारख्या कोरडवाहू पिकाची लागवडही उत्तम होऊ शकते.

२. हवामानानुसार फळझाडाची व त्याच्या जातीची निवड :-

हवामानानुसार फळझाडांची निवड ही महत्वपूर्ण बाब आहे. त्यानुसार निवड न झाल्यास फळे न येणे, फळेलागल्यास फळांची प्रत खालावणे, उशिरा फळे लागणे, रोग व किडीचा प्रादुर्भाव इत्यादि प्रश्न व समस्या भेडसावतात. म्हणून हवामानानुसार फळ झाडांची लागवड करावी. उदा. समुद्र किनाऱ्यालगतच्या उष्णदमट डोंगर उतारावरील जमिनीत हापूस आंबा चांगला येऊ शकेल. परंतु अशा ठिकाणी कोरड्या हवामानात संत्र्यामोसंब्यांच्या, द्राक्ष्यांच्या बागा यशस्वी होणार नाहीत. तसेच कोरड्या हवामानात रत्ना, केसर, सिंधू यासारख्या आंबा जातीची लागवड यशस्वी होऊ शकेल. परंतू कोरड्या हवामानाच्या कसदार जमिनीत सुपारी, मसाला पिकाची लागवड यशस्वी होणार नाही. जशी ती उष्ण दमट हवामानाच्या चांगल्या निचरा होणाऱ्या व वर्षभर ओलीताची सोय असलेल्या जमिनीत चांगल्या प्रकारे येऊ शकतात. तसेच दमट हवामानात लिंबू वर्गीय पिक, रोगामुळे तसेच डाळिंब पिक किड व रोगामुळे चांगले येऊ शकत नाही.

३. पाण्याची सोय :-

बागायती फळबागांना नियमित पाणी द्यावे लागते. अशा बागायती फळ झाडांची लागवड करताना कितपत पाणी पुरवठा पुरेल किंवा पाण्याची उपलब्धता किती आहे याचा विचार करावा तसेच कोरडवाहू पावसाच्या पाण्यावर येणारी फळपिके लागवडीच्या सुरवातीस पहिली तीन ते चार वर्षे चांगल्या व समाधानकारक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. नारळ, सुपारी, केळी, पपई, चिकू, मसाला पिके यांना इतर फळझाडांपेक्षा जास्त पाणी लागते. तसेच फळझाडावरील किड व रोगांच्या नियंत्रणाकरिता आवश्यक फवारणीसाठी ही पाण्याची आवश्यकता असते. म्हणून पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळ पिकाची निवड करावी.

४. कलमे रोपांची उपलब्धता :-

फळबाग लागवडीची निश्चित झाल्यावर पिकानुरूप चांगली जातिवंत व खात्रीलायक कलमे रोपांची उपलब्धता खात्रीलायक माध्यम अगर शासकिय रोपवाटिका, शासनमान्य रोपवाटिका यांच्याद्वारे वेळीच करणे अत्यंत महत्वाची बाब आहे. अन्यथा सर्व तयारी करून कलमे रोपांच्या उप्लब्धतेत अभावी हंगाम फुकट जाण्याची दाट शक्यता असते. किंवा मिळतील त्या निकृष्ट दर्जाची कलमे लावण्याची पाळी येते. त्याचप्रमाणे लागवडीसाठी आवश्यक साहित्य खते, किटकनाशके यांची ही उपलब्धता वेळीच करणे गरजेचे आहे. कलम लागवड केल्यानंतर कलमांना आधार देण्यासाठी प्रत्येकी तीन बांबूच्या काठ्याप्रमाणे एका टोकाला डांबर लावून तयार ठेवाव्यात.

५. फळबागेची आखणी :-

मोठ्या प्रमाणावर फळझाडे लागवड करावयाची असल्यास वेगवेगळे विभाग पाडून व त्यांना जोडणारे रस्ते यांचे नियोजन आवश्यक आहे.. तसेच पाण्याच्या साठ्यासाठी टाक्या, पाईप लाईन, गेटव्हॉल्व्ह, कॉक इत्यादि बाबतचे जास्त क्षेत्र फुकट न घालविता नियोजन करणे गरजेचे आहे. रस्ते व पाण्याच्या लाईन करिता जास्त जागा वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पाण्याच्या उपलब्धतेजवळ ज्या पिकांना जास्त पाण्याची गरज आहे, अशी फळझाडे निवडावीत. तसेच जमिनीचा चढउतार, सपाटभाग, माळरान यानुसार विविध फळ पिकांची पिकांच्या आवश्यकतेनुसार निवड करावी. विविध पिकांना शिफारस केलेले अंतर व शिफारस केलेल्या आकारमानाचे खड्डे मारावेत. फळझाड लागवडीसाठी खड्डे मारताना ते खड्डे पाऊस पडण्यापूर्वी एक महिना अगोदर मारून प्रखर सूर्यप्रकाशात उघडे ठेवावेत. पाऊस पडण्यापूर्वी पाच-सहा दिवस अगोदर भरून घ्यावेत. खड्डे भरतेवेळी अर्धाखड्डा मातीने भरून घ्यावा. अर्ध्या खड्ड्यात २ कि. किंवा १ कि. सुपर फॉस्फेट ५ ते ६ घमेली कंपोस्ट खत किंवा २ ते २ १/२ कि. सेंद्रिय खत प्रोटोमील अर्ध्या मातीत मिक्स करून भरून घ्यावा. खड्डा भरणेपूर्वी वाळवीच्या बंदोबस्तासाठी खड्ड्याच्या तळाला व चारही बाजूना ४ टक्के एन्डोसल्फान पावडर किंवा २ टक्के मिथिलपॅराथिऑन पावडर प्रत्येकी १०० ग्रॅम या प्रमाणात पसरावी. फळबागांची आखणी शक्यतो चौकोनी पद्धतीने करावी. ही पद्धत सर्व दृष्टीने सोयीची व लागवडीस सुलभ अशी आहे. या पद्धतीत २ झाडांमधील व ओळीतील अंतर सारखेच असते. इतर पद्धती क्रिनकनेस षटकोनी पद्धतीची ही शिफारस करण्यात येते. प्रमुख फळ पिकांसाठी अंतर व खड्ड्याच्या आकारमानाची व खताची शिफारस पुढीलप्रमाणे आहे.

आंबा १० मी. * १० मी. अंतर १ मी. * १ * खड्डे २ कि. सि. सु. फॉस्फेट १ कि. प्रोटोमील

नारळ ८ मी. * ८ मी. १ मी. * ११ मी. * १ मी. खड्डे २ कि. सि. सु. फॉस्फेट १ के. प्रोटोमील

काजू ८ मी. * ८ मी. ०.६ * ६ मी. खड्डे १ कि. सि. सु. फॉस्फेट १ के. प्रोटोमील

सुपारी ३ * ३ मी. ०.६ * ६ मी. खड्डे १ कि. सि. सु. फॉस्फेट १ के. प्रोटोमील

कोकम ६ * ६ * ६ मी. * ०.६ * ०.६ * ६ * ०.६ खड्डे २ कि. सि. सु. फॉस्फेट १ के. प्रोटोमील

चिकू १२ * १२ * १२ मी. १ मी. * १ मी.. * १ मी. खड्डे २ कि. सि. सु. फॉस्फेट १ के. प्रोटोमील

६. लागवडीची वेळ :-

फळझाडाची लागवड शक्यतो खात्रीशीर पाऊस सुरु झालेवर पावसाच्या सुरवातीला जून महिना अगर जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात करावी. अति पावसात अगर उशीरा पावसाच्या शेवटी सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये फळझाड लागवड करू नये. पावसाच्या सुरुवातीस लागवड केलेली झाडे चांगली समाधानकारक वाढतात. काही कालावधीकरिता पाण्याचा ताणही सहन करू शकतात. परंतू उशीरा लागवड केलेल्या झाडांची समाधानकारक वाढ होऊ शकत नाही. म्हणून जून, जुलै पर्यंत वेळेवर झाडाची लागवड झाल्यास वाढ जोमाने होते.

७. कुंपण :-

फळझाडांच्या लागवडीपूर्वीच शक्यतो कुंपण तयार करावे. फळझाड लागवड केल्यानंतर फळझाडांची नविन वाढ जनावरे खातात. तसेच रोपे व कलमे पायाखाली तुडवितात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानी होत असते. लागवड केलेल्या कलमांच्या नवीन वाढीवर झाडांची पुढील वाढ व उत्पादन अवलंबून असते. म्हणून सुरुवातीच्या काळात झाडांची गुरांपासून राखण अत्यंत महत्वाची असते. कुंपणासाठी बागेसभोवती करवंद, चिल्लार, शिकेकाई किंवा बांदावर निवडुंग यांची लागवड करून जिवंत कुंपण करावे.

अनुदानित योजनेत सहभागी व्हावयाचे असल्यास कागदपत्रांची पूर्तता – शासनाच्या १०० टक्के अनुदानित योजनेत सहभागी व्हावयाचे असल्यास गावातील कृषिसहाय्यक अगर ग्रामविस्तारक यांच्याशी संपर्क साधावा. माहे एप्रिल मध्ये फळझाड लागवडीचा प्रस्ताव सादर करावा, त्या करीत आवश्यक ७/१२, ८/अ तसेच जमिनीचा नकाशा इत्यादी कागद पत्रांची लवकरात लवकर तजविज करावी. ग्राम तालुका पातळीवरील कृषि खात्याचे अधिकारी व कार्यालयाशी संपर्क साधून वेळेवर योजनेची माहिती करून घ्यावी.

अशा प्रकारे फळबागा लागवडीची पूर्व तयारी करावी, त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरील अडचणींचा विचार करून फळझाड लागवडीचे वेळीच नियोजन करून कृषि खाते, कृषि विद्यापीठे, कृषि संशोधन केंद्र यांचे तांत्रिक मार्गदर्शन व सल्यानुसार फळझाड लागवड केल्यास फळझाड / फळबागा लागवड निश्चितच यशस्वी होण्यास मदत होईल.

Close Menu